भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाकाजवळ अज्ञात पाच जणांनी दोन जणांना काठीने बेदम मारहाण करून मोबाईल २ हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकारे रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिलवकुमार पुनम (वय-२८) रा. कोयागुड्डू मंडळ राज्य तेलंगाना आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र बुकीया हरिलाल हे दोघेजण सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाका दरम्यान पायी जात असतांना काही अज्ञात ५ जणांनी त्यांना सफेद बिलावा घेण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून जुना टोल नाका आणि मुक्ताईनगर हायवेच्या जवळील मोकळ्या जागेत घेऊन त्यांना दोघांना काठीने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील मोबाईल, २ हजारांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकुण ४२ हजार रूपये किंमतीचा जबरी हिसकावून संशयित पसार झाले. ही घटना घडल्यानंतर मीलवकुमार पुनम यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल होताच यातील विनोद चंद्रकांत सोनवणे (वय-३०) रा. जाडगाव ता. भुसावळ आणि नरेंद्र विकास सपकाळे (वय-३०) रा. साक्री फाटा भुसावळ अश्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि हरीश भोळे करीत आहे.