भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरानजीक हॉटेल तनरीका समोरील उड्डाण पुलाजवळ गाडीला कट मारून अडवून तरूणासह एकाला बेदम मारहाण करत सोन्याची चैन, सोन्याचे लॉकेट आणि वॉलेट असा एकूण ३४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर रामेश्वर सदावर्ते (वय-३१) रा. न्यू डायमंड नगर, नागपूर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून कपड्यांचा व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतो. किशोर सदावर्ते हा १५ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता त्याच्या मित्रासोबत राष्ट्रीय महामार्गावरून कारमधून जात होते. त्यावेळी आज्ञात तीन जणांनी त्यांच्या गाडीला कट मारून पुढे जाऊन रस्ता आडविला. त्यानंतर तिघांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सोन्याचे लॉकेट आणि वॉलेट असा एकूण ३४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून लांबविला. हा प्रकार घडल्यानंतर किशोर सदावर्ते या तरुणाने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहे.