जळगाव प्रतिनिधी । एक लाखाच्या दागिन्यांसाठी चुलत मामीला देवीच्या दर्शनासाठी शिरागड येथे नेण्याचा बहाणा करून विदगाव जवळील नदीच्या काठी असलेल्या जंगलात हत्या केल्याचा प्रकार २० डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला होता. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या खुनी भाचा आणि मांत्रिकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
माया दिलीप फरसे (वय ५१, रा. क्रांती चौक, शिवाजीनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. तर भाचा अमोल रतनसिंग दांडगे (वय २७ रा. शिवाजी नगर ) आणि मांत्रिक संतोष रामकृष्ण मुळीक (वय २२, रा. शिवाजीनगर), असे दोन्ही संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, मायाबाई फरसे ह्या पत्नी दिलीप रूपचंद फरसे यांच्यासोबत शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात वास्तव्याला आहे. मायाबाई यांचा चुलत भाचा अमोल दांडगे हा नातेवाईक असल्याने त्यांच्याघरी अधूनमधून भेटण्यासाठी येत होता. माया फरसे ह्या महिला शिवाजी नगरातील सारथी पापड कारखान्यात कामाला होती. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कारखान्यात कामाला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. दिवसभर शोध घेऊनही परत न आल्याने दुसर्या दिवशी पती दिलीप रुपचंस फरसे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पोलीसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्हीच्या आधारे चुलत भाचा अमोल दांडगे याला ताब्यात घेतले. त्याला खाकी दाखवताच मामीचा खून केल्याचे कबुल केले. मयत मायाचा मृतदेह जळगाव तालुक्यातील विदगाव शिवारातील जंगलात बुजल्याचे सांगितल्यावर पोलीसांनी घटनास्थळी जावून मृतदेह बाहेर काढून पंचानामा केला. जादुटोण्यातून महिलेला दांडगे याने मांत्रिक संतोष रामकृष्ण मुळीक (वय २२, रा. शिवाजीनगर)यांच्या मदतीने जाळण्याचा प्रयत्न करून तिचा खून केल्याचे उघड झाले. याप्रकरणी दोघांना पोलीसांनी अटक करून शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही संशयितांना बुधवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.