पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील महामार्ग ६ वर सबगव्हाण गावानजीक हवालाचे कापूस व्यापारी हे १८ लाख रुपये घेऊन येत असतांना त्यांना दोन जणांनी मिर्चीची पूड फेकून लुटल्याचा प्रकार कथित रस्तालूट येथे (दि.२४) रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडला आहे. मात्र, ही लुट नसून एक बनाव असल्याचे प्रकार पारोळा पोलिसांना उघडकीस आणला आहे. याप्रकरणातील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चोरवड येथील कापूस व्यापारी सुभाष पाटील यांचे कापूस व्यवसायाचे हवालाचे धुळे येथे आलेले १८ लाख रुपये भागवत चित्ते व अन्य एक जण दुचाकीने धुळे येथून पारोळा येथे आणत होते. त्यावेळी सबगव्हाण गावानजीक दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकल थांबवून, त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्याकडील १८ लाख रुपये घेऊन पळ काढला, असे भागवत चित्ते यांनी पोलिसांना सांगितले. पण चित्ते हा हे सांगत असताना तो काही तरी बनाव करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला खरा प्रकार काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविला. तेव्हा चित्ते हा पोपटासारखा बोलू लागला. त्याने हा सर्व प्रकार बनाव केल्याचे लक्षात आले. खरा प्रकार उघडकीस आला. त्याने तालुक्यातील उंदिरखेडे येथील संदीप परदेशी याने ही लूट केल्याची सांगितले. तेव्हा पारोळा पोलीस पथक हे उंदिरखेडे येथे गेले. त्यावेळी या ठिकाणी संदीप परदेशी नसून, तो दीपक परदेशी होता. त्याने घरातून १७ लाख ९६ हजार रुपये रोख रक्कम काढून दिली. त्यासोबत आणखी एक अनिल बाबूसिंग परदेशी चाळीसगाव हा उंदिरखेडे येथे बहिणीकडे आला होता. या बनावट लूट प्रकरणात भागवत चित्ते (वय ४३, रा.पारोळा), दीपक परदेशी (वय-३४ रा.उंदिरखेडे), अनिल बाबूसिंग परदेशी (वय-२३, रा.चाळीसगाव) या तिघांना पारोळा पोलिसांनी अटक केली.
यांनी केली कारवाई
यावेळी पोलीस पथकात पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पंकज राठोड, विजय शिंदे, सुनील वानखेडे, अनिल वाघ आदींनी या बनावट प्लॅनमधील तिन्ही आरोपींना अटक केली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.