जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सेंट जोसेफ येथे पती-पत्नीच्या नावाने बोगस मतदान झाल्याचा प्रकार आज दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान मतदान केंद्र प्रमुख यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने निराश होवून ते दाम्पत्य मतदान न करताच घरी परतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कांतीलाल भास्कर पाटील आणि त्यांच्या पत्नी सुरेखा कांतीलाल पाटील हे दोघे दुपारी मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांचे मतदान झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत मतदान केंद्र प्रमुखांना माहिती दिली, तेव्हा त्यांनी त्यांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. या दोघांचेही मतदार यादीत फोटो चुकीचे आहेत, तसेच कांतीलाल पाटील यांच्या वडिलांचे नाव भास्कर असताना यादीत शांतीलाल असे लिहिलेले आहे.
‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वी महापालिका व लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. त्यावेळीही नाव आणि फोटोंचा घोळ लक्षात आला होता. त्याबाबत लेखी अर्ज देवून बदल करण्याची मागणी केली होती, पण कारवाई झाली नाही, यावेळी तर मतदानच बोगस झाले आहे. यावेळी मात्र लेखी तक्रार न देता त्यांनी घरी निघून जाणेच पसंत केले.