बोदवड प्रतिनिधी । जामठी येथील शर्माजी काँम्पलेक्समध्ये असलेले टाटा इंडीकँश कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज मंगळवारी (दि.१४) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरातील एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याची बाब या प्रकारातून पुढे आली आहे.
जामठी येथील शर्माजी काँम्पलेक्स मध्ये असलेले टाटा इंडीकँश कंपनीचे एटीएम रात्रीच्या वेळेस अज्ञात संशयितांनी सळई, टिकाव, विळाच्या सहाय्याने तोडून एटीएम फोडले त्यातील रोकड सुरक्षित असल्याचे समजते. एटीएम जवळच असलेले संदीप भागवत माळकर यांच्या मालकीचे संदीप पान सेंटर ही अज्ञात चोरट्यांनी फोडले असुन दोन ते तीन हजारांची रोकड लंपास असुन सिगारेट पाकीटसह अन्य वस्तू लांबवील्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाईचंद मालचे, संजय भोसले, निखिल नारखेडे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, यावेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी डि.वाय.एस.पी. सुरेश जाधव, मुक्ताईनगरचे पो.नि.सुरेश शिंदे.तसेच श्वान पथक ही पाचारण करण्यात आले होते.श्वानाने मुख्य अर्ध्या रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला मात्र पुढे यश मिळाले नाही.श्वान पथकाचे एच.सी परदेशी ,पी.सी झोपे उपस्थित होते तसेच ठसे तज्ज्ञ एच.सी.घटाटे, साहेबराव चौधरी या ठसेतज्ज्ञांनी ठसे घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
एटीएम शेजारी दारूच्या बाटल्या
जामठीत बोदवड रस्त्यावर असलेल्या शर्माजी काँम्पलेक्समध्ये असलेल्या टाटा कंपनीचे इंडीकँश कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडले.व शेजारी असलेले संदीप पान सेंटरमध्ये ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी दारू पिऊन हे कृत्य केले असावे ,तश्या दारूच्या बाटल्या ही एटीएम च्या शेजारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या बाटल्यांचे बँच नंबर घेण्यात आले असुन चौकशी साठी पाठविण्यात आले आहे. उशिरा पर्यंत माहिती घेणाचा प्रयत्न केला असता अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .सदर चोरीच्या गुन्ह्याचा अधिक तपास बोदवड पोलीस करीत आहेत.
बँकेचा सुरक्षेबाबत निष्काळजीपणा
या एटीएमच्या सुरक्षेकडे संबंधित बँकेने केलेला निष्काळजीपणाही उघड झाला आहे. फिर्यादीनुसार या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नव्हता. अलार्मची सुविधाही नव्हती. एटीएमशी छेडछाडीचा प्रकार झाल्यावर एसएमएस प्रणालीही उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे.