बनावट स्वाक्षरी करणार्‍याला दोन दिवसांची कोठडी

बोदवड प्रतिनिधी । येथील मुख्याधिकार्‍यांची बनावट सही करून फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या अमोल शिरपूरकर याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, बोदवड येथील नगरपंचायत मुख्याधिकारी यांची बनावट सही करून बांधकाम परवानगी मिळवून प्रशासनाची फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी आराध्या कन्स्ट्रक्शनचा अभियंता अमोल शिरपूरकर याच्या विरूध्द यात १ लाख २२ हजार ८९७ रुपयांचा महसूल बुडवल्या प्रकरणी गुरुवारी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नगरपंचायत मुख्याधिकारी यांची बनावट सही करून बांधकाम परवानगी घेतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी नगरपंचायत अभियंता रितेश बच्छाव यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी ज्यांच्या नावाने परवानगी अर्ज होता त्या जमीन मालक प्रतिभा अनिल कोकाटे यांना नोटीस पाठवून चौकशी केली असता अभियंता अमोल शिरपूरकर याने पैसे घेऊन कोकाटे यांना बनावट बांधकाम परवानगी मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले तसेच मुख्याधिकार्‍यांची बनावट सही करून प्रशासनाची तसेच महसूल बुडवत शासनाची फसवणूक केल्याने त्याच्या विरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी शिरपूरकर यास अटक करून न्या. एस.डी. गरड यांच्या कोर्टात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

Protected Content