ब्राह्मणामुळेच तुम्हाला मिळाले तिकिट ! : फडकेंचा खडसेंना टोला

बोदवड प्रतिनिधी । ”त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने खापर ब्राह्मणांवर फोडले, पण, स्व. अशोक फडके नावाच्या ब्राह्मणाने उदारभाव दाखवला म्हणून तुम्हाला त्या काळी पक्षाचे तिकिट मिळाले…!” असा टोला अशोक फडके यांनी एकनाथराव खडसेंचा नामोल्लेख न करतांना मारला. यावेळी त्यांनी खडसेंवर जोरदार टिका केली.

नामोल्लेख न करतांना टीका

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी अलीकडच्या काळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरूध्द आक्रमक भूमिका घेतली आहे. मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील पक्षाच्या बैठकींमध्ये त्यांनी खडसेंवर थेट जोरदार टीकास्त्र सोडले. तर बोदवड येथील गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित भाजपच्या बूथ संपर्क अभियानात त्यांनी खडसे यांचा नामोल्लेख न करता जोरदार हल्लाबोल केला.

जातीवाचक चेहरा सर्वांसमोर आला

याप्रसंगी डॉ. फडके म्हणाले की, बरे झाले…त्यांच्या जाण्याने त्यांचा जातीवाचक चेहरा तरी सर्वांसमोर आला. ते मतदारसंघात चांगला लीड मिळत नाही म्हणून नेहमीच मराठ्यांना दोष देत राहिले. विधान परिषदेत मुलाला दादांनी मदत केली नाही म्हणून राजस्थानी समाजावर आगपाखड केली. दादांना सदैव मंगळसूत्र बदलणारी बाई म्हणून हिणवले. आता मुख्यमंत्री पद न मिळाल्याचे खापर ब्राह्मणांवर फोडले. पण, स्व. अशोक फडके नावाच्या ब्राह्मणानेच उदारभाव दाखवला म्हणूनच तुम्हाला त्या काळी पक्षाचे तिकीट मिळाले होते अशी आठवण त्यांनी करून दिली. तर बारा बलुतेदार, अठरापगड जातींनी पक्षावर विश्‍वास दाखवला म्हणून तुम्ही आतापर्यंत निवडून आलात असे डॉ. राजेंद्र फडके म्हणाले.

चांगले चेहरे पुढे येतील !

डॉ. फडके पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जातीवाचक भाव भाजप कधीच खपवून घेणार नाही. उडालेल्या कावळ्यांच्या जोरावर कधीही गड किल्ले जिंकता येत नाहीत. ते जिंकण्यासाठी मावळ्यांचीच गरज असते. असे मावळे आज भारतीय जनता पक्षासोबत आहेत. त्यांच्या जाण्याने खर्‍या कार्यकर्त्यांना जनतेची सेवा करताना अडचणी येणार नाहीत. आता काही चांगले चेहरे मतदारसंघात पुढे येतील, असेही डॉ.फडके यांनी सांगितले. आतापर्यंत पक्षाने त्यांना एवढे दिले, तरीही त्यांना पूर्ण भरलेला ग्लास कधीच दिसला नाही. केवळ ग्लासामध्ये शिग मिळाली नाही म्हणून पक्ष सोडला, असे फडके म्हणाले.

यांची होती उपस्थिती

डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजय भोळे, जामनेरचे माजी पंचायत समिती सदस्य नवलसिंग पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर उपस्थितांमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, अनंतराव कुलकर्णी, अनिल खंडेलवाल, सुधीर पाटील, नाना कदम, राजू साबळे, प्रवीण परदेशी, राजू डापसे, सोपान ताठे, डॉ. ब्रिजलाल जैन आदींसह इतरांचा समावेश होता.

Protected Content