भुसावळ, दत्तात्रय गुरव | बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीतील पराजय हा खडसेंना धक्का तर आ. चंद्रकांत पाटलांना उत्साह देणारा ठरल्याचे सर्वांचे मत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये जळगाव महापालिकेसह दोन नगरपालिकांमधील भाजपचा झेंडा उतरल्यानंतर आता बोदवडमध्ये भाजप भुईसपाट झाल्याने पक्षाचे जिल्ह्याचे नेते आ. गिरीश महाजन आणि या परिसराच्या खासदार असणार्या रक्षाताई खडसे यांच्या आगामी वाटचालीत हा पराभव अडसर बनण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जाणून घ्या बोदवडच्या निकालाचा आखणी एक वेगळा पैलू. . . .
बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेने दणदणीत बहुमत संपादन केल्याने एकनाथराव खडसे, त्यांची कन्या आणि अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दणका बसला आहे. या माध्यमातून बोदवड शहरावरील खडसे यांची पकड पहिल्यांदाच सैल झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या जोरदार लढतीत भारतीय जनता पक्ष बोदवडमध्ये अक्षरश: भुईसपाट झालेला आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा ईश्वरचिठ्ठीमुळे विजय झाल्याने थोडी तरी लाज राखली गेली. अन्यथा येथे पक्षाला अक्षरश: भोपळा मिळाला असता.
या प्रभागाची गंमत देखील पाहण्यासारखी आहे. येथे शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त सहा मते मिळाली आहेत. याचाच अर्थ असा की, येथे शिवसेनेने आपली ताकद पूर्णपणे भाजपच्या पाठीशी उभी केल्यानेच भाजपचा उमेदवार ३७४ मतांपर्यंत पोहचून नंतर नशिबाच्या बळावर विजय मिळवू शकला. पक्षाच्या अन्य उमेदवारांना अक्षरश: अल्प मते मिळाली आहेत. अर्थात, काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाडण्यात मोलाची कामगिरी पार पाडली आहे. यात प्रभाग क्रमांक दहामध्ये मातब्बर अशा कैलास चौधरी यांच्या सौभाग्यवतींना पराभव स्वीकारावा लागला आहे. हेच दोन निकाल राष्ट्रवादीकडे गेले असते तर बोदवडचे चित्र आज बदलले असते. मात्र शिवसेनेसाठी ‘गेमचेंजर’ची भूमिका ही भाजपच्या उमेदवारांनीच पार पाडल्याचे कुणालाही नाकारता येणार नाही.
‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ ही आदिम रणनिती मानली जात असून याचा राजकारणात विपुल वापर केला जातो. मात्र शत्रूचा नायनाट करतांना दुसर्याला दिलेली रसद ही भविष्यातील आपल्याच पराभवाची नांदी ठरू शकते. भाजपसाठी हाच धोका निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांचा विचार केला असता भारतीय जनता पक्षाची सत्ता असणार्या भुसावळ आणि सावदा नगरपालिकेतील नगराध्यक्षांसह बहुसंख्य सदस्य हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. तर फैजपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार असणार्या हेमराज चौधरी यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली आहे. मुक्ताईनगरातील बहुसंख्य नगरसेवक देखील आधीच शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामुळे भुसावळ, फैजपूर, सावदा आणि मुक्ताईनगर या नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीत भाजपला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. तर बोदवड नगरपंचायत आजच हातातून निघून गेलेली आहे.
वास्तविक पाहता एकेक नगरपालिका ही अतिशय महत्वाची असल्याने तापी खोर्यातील पाच-सहा नगरपालिका हातातून गेल्या तर ती पक्षाचे जिल्हा नेते असणार्या आ. गिरीशभाऊ महाजन यांच्यासाठी मोठी नामुष्की ठरणार आहे. आधीच गत मार्च महिन्यात जळगाव महापालिका हातातून गेल्याने आ. गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला होता. यातच नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असतांना भाजपच्या मैदानावर अक्षरश: सामसूम दिसून येत आहे. यामुळे गिरीशभाऊंना त्यांच्या मूळ स्वभावानुसार अर्थात बेरजेच्या राजकारणाचाच आधार घ्यावा लागणार आहे. अन्यथा तापी खोर्यातील नागरी भागांमधून भाजप हद्दपार होण्याचा धोका वाढीस लागणार आहे.
बोदवडमधील निकाल हा आ. गिरीश महाजन यांच्या प्रमाणे खासदार रक्षाताई खडसे यांना देखील विचार करायला लावणारा आहे. कारण बोदवड येथील प्रचाराची धुरा या दोन नेत्यांनीच सांभाळली होती. आगामी नगरपालिका निवडणुकीतही परिसरातील नगरपालिकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यावरही राहणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रक्षाताई खडसे या भाजपच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील असे अनेक राजकीय निरिक्षक पैजेवार सांगत आहेत. यात काय होईल ते सर्वांच्या समोर येईलच. मात्र आता तरी आपल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला यश मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर नक्कीच आहे.
जळगाव महापालिकेच्या नंतर शिवसेनेने भाजपला बोदवड येथे अतिशय जोरदार तडाखा देऊन नेस्तनाबूद केले आहे. जळगावातील सत्ता गेल्यानंतर भाजपला हात चोळण्यावाचून काहीही उरलेले नाही. तर बोदवडमध्ये मात्र खडसेंची जिरल्याचा आनंद हा औटघटकेचाच ठरणार आहे. दुसर्याच्या घरी मूल झाले म्हणून पेढे वाटण्याचा वेडेपणा राजकारणात चालत नाही. गिरीशभाऊंना तेच समजून घ्यावे लागेल. अन्यथा जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाची पकड ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून निसटण्याचा धोका आहे.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुरब्बीपणे नाथाभाऊंना धक्का दिलाय हे कुणी नाकारणार नाही. यासाठी त्यांनी विधानसभेप्रमाणेच या वेळेसही खडसे विरोधकांची मदत घेतली. मात्र याच वेळेला त्यांनी भाजपसाठी देखील धोक्याचा इशारा देऊन टाकलाय. तापी नदीच्या खोर्यात आजवर डॉमीनंट असणार्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचे जबर आव्हान उभे ठाकणार यात शंकाच नाही. यात आज चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील मैत्रीचे संबंध असेच कायम राहतील असे देखील कुणाला सांगता येणार नाही. तथापि, आपल्या पक्षासाठी एक नगरपंचायत खेचून आणणार्या आ. चंद्रकांत पाटील यांनी जे कमावले, तेच गिरीशभाऊ आणि रक्षाताईंनी गमावल्याची नोंद कुठे तरी झालीच आहे. आपल्याला वाट पहायची ती याचे काय परिणाम वा दुष्परिणाम होतात त्याचीच. . . . !