५२ लाखांचा झोल : ग्रामसेवकासह माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा आणि मुक्तळ या चार गावांच्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल ५२ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकासह शेलवडच्या माजी सरपंचाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा व मुक्तळ या ग्रामपंचायतींमध्ये ३० डिसेंबर २०१८ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीदरम्यान तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी केलेल्या अनियमिततेबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र त्याची चौकशी न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी गटविकास अधिकारी आणि विस्तार विभाग (ग्रामपंचायत) अधिकार्‍यांना निलंबित केले होते.

यानंतर याच प्रकरणात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांनी फिर्याद दाखल केली. याच्या माध्यमातून , बोदवड तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा व मुक्तळ या ग्रामपंचायतींमध्ये १४व्या व १५व्या वित्त आयोगाच्या ५२ लाख ९४ हजार १८० हजार रुपये निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय निधी परस्पर वळविण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

सदर फिर्यादीत शेलवड येथील ग्रामपंचायतीच्या अपहारात ग्रामसेवक संदीप निकमसह माजी सरपंच नीलेश माळी यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. या दोघांनी संगनमत करून स्वच्छ भारत अभियानात मृतांच्या नावे बोगस बँक अकाऊंट उघडून हा अपहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणी शेलवडचे ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम आणि तत्कालीन सरपंच निलेश शांताराम माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content