बोदवड- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी संबंधीत दुचाकीस्वाराला न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व ११ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
८ नोव्हेंबर २०१५ या दिवशी रात्री १०.४० वाजेच्या सुमारास हनुमान घाटी मंदिराजवळ कल्पेश बावस्कर, रा. कोल्हाडी याने त्याच्याजवळ असलेली टीव्हीएस सँट्रो मोटारसायकल (क्र.एमएच १९ एडी २१६६) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने नेत होता. यावेळी रस्त्याने पायी चालणारे संदीप बळीराम बारी, रा.बोदवड यांना जोरदार धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कल्पेश बावस्करवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलिस दिनकर धायडे यांनी केला. या अपघाताच्या केसमध्ये बुधवारी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी के.एस. खंडारे यांनी निकाल जाहीर करत या गुन्ह्यातील आरोपी कल्पेश बाविस्कर यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व ११ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी १० हजार रुपये मृत संदीप बारी यांच्या कुटुंबीयांना देण्याचा आदेशही न्यायालयाने पारित केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संतोषकुमार कलंत्री यांनी काम पाहिले तर आरोपी पक्षातर्फे ऍड.खैरनार यांनी काम पाहिले.