उधारीच्या पैशांच्या वादातून झाला खून : तीन संशयितांची झाडाझडती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चितोडा येथील मनोज भंगाळे यांच्या क्रूर हत्येमागे उधारीच्या पैशांचा वाद असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी तिन्हा संशयितांची पोलीस कसून चौकशी करत असल्याचे वृत्त आहे.

आज सकाळी सांगवी ते डोंगरकठोरा मार्गावर चितोडा येथील मनोज भंगाळे यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसर हादरला. या प्रकरणी दुपारी मयताचे भाऊ हेमराज भंगाळे यांची  फिर्याद दाखल करण्यात आली. आपल्यासाठी ही फिर्याद जशीच्या तशी सादर करत आहोत. या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ मनोज संतोष भंगाळे हे जमीन खरेदी-विक्रीचा कमीशन एजंट म्हणून काम करत होता. त्यांच्या भावाने चितोडा गावातीलच कल्पना शशिकांत पाटील यांना चार लक्ष रूपये उधारीच्या स्वरूपात दिले होते. मात्र त्या उधारी देण्यास टाळाटाळ करत होत्या. यावरून त्यांचे अल्प वाद देखील झाले होते.

काल रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास मनोज भंगाळे हे त्यांच्या मालकीच्या एमएच १९ डीआर ९५९८ क्रमांकाच्या दुचाकीवरून बाहेर जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी आपल्याला कल्पना शशिकांत पाटील यांनी पैसे घेण्यासाठी डोंगरकठोरा फाट्याजवळ एकट्याने बोलावले असल्याचे सांगितले. यानंतर ते निघून गेले. यानंतर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मनोज यांची पत्नी शुभांगी या त्यांच्या घरी आल्या. मनोज भंगाळे हे अद्याप घरी परतले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून हेमराज भंगाळे यांनी रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्रांसह परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.

यानंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास हेमराज भंगाळे यांचे आतेभाऊ बाळू भंगाळे यांना एका परिचिताचा फोन आला. यात त्यांनी मनोज हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले असल्याचे सांगितले. यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता मनोज भंगाळे हे मृतावस्थेत आढळून आल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर या मृत्यूसाठी कल्पना मधुकर पाटील हिच्यासह तिच्या साथीदारांवर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी तिघा संशयितांची कसून चौकशी सुरू केली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी शक्यता आहे.

Protected Content