अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय, अमळनेर यांच्या वतीने राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी आणि विश्वबंधुत्व दिनानिमित्त एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.

कार्यक्रमाची सुरुवात राजयोगिनी दादींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विद्यालयाच्या संचालिका विद्या दीदी, सुषमा दीदी, रंजू दीदी, आरती दीदी, वैष्णवी दीदी, ॲड. तिलोत्तमा पाटील, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी रक्तदान करणाऱ्यांचे मनोबल वाढवताना ‘रक्तदान हेच जीवनदान’ असल्याचे प्रतिपादन केले. या शिबिरासाठी हरचंद लांडगे, ॲड. तिलोत्तमा पाटील, जितेंद्र वाणी, प्रेमराज सूर्यवंशी, रमेश सैंदाणे, नरेंद्र महाजन, तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरात एक विशेष योगायोग जुळून आला. मुंबई ए. टी. एस. पोलीस पथकातील जितेंद्र सूर्यवंशी यांनी आतापर्यंत १७ वेळा रक्तदान केले होते, आणि आज त्यांनी १८ व्यांदा रक्तदान केले. हा योगायोग राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथीच्या दिवशीच जुळल्याने तो चर्चेचा विषय ठरला. शिबिरात जीवन ज्योती रक्तपेढीच्या टीमने रक्त गट तपासणी आणि रक्त संकलनाचे काम केले. या शिबिरामुळे गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.



