जळगाव, प्रतिनिधी । स्वराज्य निर्माण सेना व शिवगंध ढोल ताशा ध्वज पथक यांच्या वतीने इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले.
रक्तदान शिबिराप्रसंगी प्रास्ताविक करताना रक्तकेंद्राच्या सचिव डॉ.अपर्णा मकासरे यांनी भर उन्हाळ्यात हि रक्तदान करून रुग्णसेवेने अक्षय तृतीया व ईद साजरी केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले व भविष्यात ही असेच आयोजन करत रहावे असे आवाहन केले. रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्तदाना सोबतच सद्य परिस्थितीत मध्यम स्वरूपाच्या कोरोना रुग्णांना प्लाझ्मा फार उपयुक्त ठरत आहे तरी कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी हि उत्स्फूर्तपाने पुढे यावे असे आवाहन केले. रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी यांनी लसीकरण करण्याआधी रक्तदान करा तसेच घरातील वय ४५ व त्या पुढील प्रत्येक सदस्यांना लसीकरण करून घेण्यासाठी आग्रह करा असे आवाहन केले. यावेळी सर्व उपस्थितांना रक्तदान व प्लाझ्मादाना विषयी असलेल्या शंकाचे निरसन केले. रेडक्रॉस रक्तकेंद्राच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन संपूर्ण टिमचा व रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उज्ज्वला वर्मा यांनी केले. या रक्तदान शिबिरासाठी नितीन मकासरे, गणेश शेटे, परेश सीनकर, दिपक सोनार, जयंत वाणी, रोहीत भावसार, संतोष ठाकरे, महेश दुबे, सौरभ तांबट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.