जो देश धावू शकत होता त्याला काँग्रेसने रांगायला लावले?? असा बुद्धीभेद फक्त आणि फक्त अशक्त बुद्धीचे हिंदुत्ववादीच करू शकतात. अशक्त बुद्धीचे यासाठी की एखादी उच्च दर्जेदार संस्था, पायाभूत सुविधा, अवकाश व इतर तंत्रज्ञान, अणुशक्ती कार्यक्रम, मोठाली धरणं एखाद्या माळरानावर उभारण्यासाठी काय करावे लागते हे जाणून घेण्याइतकी कल्पनाशक्ती त्यांच्यात नसते.
लुटला गेलेला देश पुनःश्च उभारण्यासाठी हजार क्षेत्रातील गरजा, समस्या भुकेल्या पोटासारखी आ वासून उभ्या असताना नक्की कुठल्या क्षेत्रास प्राथमिकता द्यावी हे सुमार दर्जाच्या नेतृत्वास कळू शकत नाही.
इतक्या मोठ्या खंडप्राय देशात फक्त शिक्षणसंस्था उभारण्यासाठी लागणारी तज्ञ मंडळी हुडकणे (इंटरनेटची सुविधा नसताना), त्यासाठी असंख्य बैठका घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन तुटपुंज्या तिजोरीतून निधी उपलब्ध करून देणे, ती संस्था प्रत्यक्षात कार्यरत होण्यासाठी अधिकार्यांना, स्थानिक नेतृत्वाला प्रोत्साहन देता येईल इतकी साधनसुचिता स्वतः पाळणे इ. गोष्टी कराव्या लागतात. संस्थेसाठी फक्त इमारत उभारणीसाठीच सिमेंट, लोखंड, पाणी आदि मुलभूत वस्तू लागतात. त्यांचेसुद्धा उत्पादन करणारे कारखाने उपलब्ध नसणार्या आपल्या देशात कामाला सुरूवात कुठून करणार? पाण्यासाठी धरणे, धरणांसाठी लोखंड, सिमेंटसाठी कारखाने आणि यासाठी पुन्हा पाण्यासाठीच यंत्रणा उभारणे आवश्यक होते. एडविनाच्या बाहुपाशात ऐषोराम करणारा मनुष्य ते करूच शकत नव्हता. कंपनीसाठी एखादी इमारत बांधण्यासाठी नेमणूक केलेला अधिकारी आपल्या बायकोच्याही बाहुपाशात पडू शकेल इतका वेळ त्याच्याकडे नसतो. इथे तर देश उभारायचा होता. असा आणि इतका मोठा देश की जो स्वतः नेहरूंनीच मोठा करून ठेवलेला होता, साडेसहाशे देश एकत्र करून.
अशा परीस्थितीत एडविनाला वर्षभर सांभाळून (ती वर्षभरच होती हं भारतात) जगातले सर्वात जास्त लांबीचे हिराकूड आणि जगातीलच सर्वात उंच भाक्रा धरण बांधण्यात आले. बोकारो, भिलाई येथे लोखंडाचे अवाढव्य कारखाने उभारण्यात आले. उद्योगधंदे, कारखाने हे आधुनिक तिर्थक्षेत्र असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आले. आयआयटी, आयआयएम सारख्या किंवा त्यासम दर्जेदार शिक्षणसंस्था प्रत्यक्ष कार्यरत झाल्या त्या नेहरूंच्याच काळात. नेहरूंनी काहीच केले नाही असे म्हणणार्या अल्पबुद्धीधारकांनी आपण शिकलो त्या शाळा कॉलेजांची स्थापना कधी झाली, घरी शुचिर्भूत होण्यासाठी, मंत्रोच्चारीत जलासाठीचे, आचमनासाठीचे, अभिषेकाचे, वरणभातासाठी गरजेची असलेली डाळ आणि तांदूळ कुणाच्या काळात बांधलेल्या धरणाच्या पाण्यामुळे आलंय हे जरी पडताळून पाहीले तरी त्यांचा बुद्ध्यांक वाढेल. नेहरू देशद्रोही असते तर हे सर्व करायला त्यांनी अडथळा आणला नसता? ते एक सोडा, मुळात पटेलांना भारत देश निर्माणच करू दिला नसता ना. शास्त्रींनी जय जवान जय किसान अशी घोषणा देऊन अन्नाचा प्रश्न, नेहरूंनी उभारलेल्या धरणांच्या जोरावर हरीतक्रांती आणून कायमचा निकाली काढला. पैसे देऊनही अन्न उपलब्ध होत नव्हते बरकां तेव्हा ! आणि पाकीस्तानचा १९६५ मधे पाडावही करून उक्ती कृतीत आणली.
नेहरूंनीच उभारलेल्या अणुभट्ट्यांच्या जोरावर इंदिराजींनी १९७४ मधे अणुस्फोट करून भारताला शत्रूपासून कायमचे निर्धोक केले. तेव्हापासूनच भारताविरूद्ध आगळीक करण्याची हिम्मत चीनने केलेली नाहीय आजवर. त्याअगोदर अणुबॉम्बशिवायही १९७१ ला त्यांनी अमेरिका, चीन आदींच्या विरोधाला फाट्यावर मारून पाकीस्तानचे दोन तुकडे करून टाकलेले होतेच. ह्यालाच सैन्याला पूर्ण मोकळीक देणे म्हणतात.
नाहीतर आजकाल आपल्याच एखाद्या चौकीला ताब्यात मिळवणे (कारगिल), सीमेवरच्या गावातील शेंबडी मुले आणि बकर्या चारणारे पाकीस्तानात जेथवर धडक मारतात आणि अमेरीकेने परवानगी दिलेली असते तेथवरच किंवा निर्मनुष्य जागी म्हणजे निर्मनुष्यच चौक्यांवर दोनचार बॉम्ब फोडून पटकन पळून या इथवरच सैन्याला मोकळीक देण्याला महायुद्ध समजले जाते. आणि तसा आदेश देणारा असून असून कोण असू शकणार? चौकीदारच नं. पक्षी.. सर्जीकल आणि एअर स्ट्राईक.
काही अवसानघातकी अजून काही वर्षांनी म्हणतीलही पाकचे तुकडे केले म्हणून तो दुखावला जाऊन आपला कायमचा शत्रू झाला, इंदिरेने असे करायला नको होते.
हजारो वर्षांपासून राजेशाहीत रूळलेल्या आणि लोकशाहीला नवख्या असणार्या आपल्या अज्ञ देशवासीयांत, नेहरूंनी रूजवलेली लोकशाही आणिबाणी आणून इंदिरेने बुजवली म्हणे… नेहरू आणि इंदिरेची लोकप्रियताच त्या त्या काळात इतकी होती की ते दोघेही विनासायास हुकूमशहा बनू शकत होते. ते न करता आणि निवडणूक हरण्याची भिती असतानाही इंदिरेने आपणहून आणिबाणी उठवली, सर्व विरोधकांना तुरूंगमुक्त केले आणि निवडणुका घेतल्या, सत्ता निरीच्छतेने विरोधकांच्या हाती सोपविली. वडिलांचा लोकशाही रूजवण्याचा वसा सर्वसमभावा पर्यंत पुढे नेत शिखांपासून प्राणास धोका असतानाही, ते केवळ शिख आहेत म्हणून माझ्या शरीररक्षकांवर मी अविश्वास दाखवणार नाही असे म्हणून देशाची विवीधता स्विकारत हौतात्म्यही पत्करले.
५६ इंचाची छाती आहे हे सिद्ध करण्यासाठी माननीय मोदींनी मूळ गोध्र्यातील मुसलमानांना स्वतःचे शरीररक्षक म्हणून नेमावे… मी फक्त मोदीभक्त होऊन सोडून देणार नाही, माझे आडनांवच मोदी असे बदलून घेईन. तरी काँग्रेसच देशद्रोही?
कल्पना करा… देशाचा पंतप्रधान सकाळी उठून नेहरूंनी बांधलेल्या धरणातील पाण्याने प्रातःविधी आटोपतोय… मनमोहनने आणलेल्या ट्वीटरवरचे ट्वीटस् पाहून शास्त्रींमुळे उगवलेल्या डाळीने बनलेला ढोकळा भक्षण करताना अधूनमधून नेहरू, इंदिरा, नरसिंह, मनमोहनच्या धोरणांमुळे फोफावलेल्या उद्योगपतीच्या पैशांच्या जोरावर चाललेल्या आपल्या पक्षाच्या जाहीराती नेहरूंनीच स्थापलेल्या इस्त्रोमधून इंदिरेने सोडलेल्या उपग्रहांद्वारे राजीवने आणलेल्या टीव्हीवर बघत, बातम्यांचा आढावा घेऊन, मनमोहनांनीच आणलेल्या आधुनिक कारने नरसिंह रावांनी आणलेल्या मोबाईलवर बोलत इंदिरेने बांधलेल्या विमानतळाकडे नेहरू, इंदिरेने रूजवलेल्या लोकशाहीच्या निवडणूक प्रचारासाठी कूच करतोय. राजीवने उभारलेल्या विमानतळावर उतरून वर काँग्रेसने काहीच केले नाही म्हणत, इंदिरेने चाचणी घेतलेल्या अणुबाँब आणि पाकीस्तानचे तुकडे केल्याच्या आत्मविश्वासामुळे बलवान झालेल्या सैन्याच्या नावावर मतं मागतोय…
अस्सल कृतघ्न माणूसच हे करू शकतो ना?
:- नंदिनी नितेंद्रसिंग पाटील ( ठाणे )