जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातील स्मशान भूमीजवळ जुन्या वादातून तीन ते चार जणांनी तुकारामवाडीतील तरुणासह त्याच्या मित्राचा रस्ता अडवून त्यांच्यावर दगडफेक करत अश्लिल शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवार, ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील तुकारामवाडीत आकाश सुकलाल ठाकूर हा तरुण राहतो, तो रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचे मित्र पवन बाविस्कर व गजानन राजेंद्र पारे या मित्रांसोबत कासमवाडी परिसरातील स्मशानभूमीजवळ उभा होता. यादरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सुरज विजय ओतारी याच्या खूनाचा राग मनात धरुन तुकारामवाडीतील पियुष ऊर्फ वाघ्या मुकूंदा ठाकूर , रोहित ऊर्फ भाल्या उत्तम भालेराव या दोघांसह कुणाल ऊर्फ दुंड्या कोळी व स्वप्निल ऊर्फ गोलू धर्मराज ठाकूर या चार जणांनी आकाश ठाकूर व त्याच्या मित्रांचा रस्ता अडविला.तसेच त्यांना अश्लिल शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. याचदरम्यान आकाश व त्याचे मित्र निघून जात असतांना चार जणांनी त्यांच्या दिशेने दगडही मारुन फेकले. या घटनेप्रकरणी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आकाश ठाकूर याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात पियुष ऊर्फ वाघ्या मुकूंदा ठाकूर , रोहित ऊर्फ भाल्या उत्तम भालेराव रा. तुकारामवाडी, कुणाल ऊर्फ दुंड्या कोळी रा. कूसूंबा ता.जळगाव व स्वप्निल ऊर्फ गोलू धर्मराज ठाकूर रा. ज्ञानदेव नगर जळगाव या जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.