मुंबई – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे मात्र भाजप राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख याच्यावर औरंगाबादमध्ये दोन दिवसापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे भाजयुपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाबाबत आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे भाजपचे षडयंत्र असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, महेबूब शेख यांच्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी शेख यांनी संपर्क केला व आपण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत असे कळविले. काही तथ्य आढळल्यास मला शिक्षा करा अशीदेखील विनंती तपास अधिकार्यांकडे केल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.
भाजपाने राजकीय फायदा उठवण्यासाठी कालपासून महेबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्या वर्षभरापासून कार्यरत असताना वेळोवेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र काही विरोधी राजकीय नेतेमंडळी करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. युवक संघटनेच्या माध्यमातून तरुण पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व समाजामध्ये शिरकाव करून वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्यांक समाजात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व पुढे येत आहे हे काही विरोधी विचाराच्या पक्षाच्या मंडळींना बघवत नाही आणि त्यातून अशा खोट्या आरोपांच्या घटना समोर येत असाव्यात अंदाजही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
तपास यंत्रणा आपला तपास करतच राहतील आणि त्यात काही आढळल्यास दोषींवर कारवाई करतीलच परंतु तपास होण्याच्या आधीच भाजपने महेबूब शेख यांना दोषी ठरवून स्वतःच्या राजकीय भाकऱ्या भाजण्याचा जो केविलवाणी प्रकार केला आहे त्याचा निषेधही महेश तपासे यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेत युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. या पत्रकार परिषदेला युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आणि मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले उपस्थित होते.