ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा ‘चक्का जाम’ : खा. रक्षा खडसे

नंदुरबार प्रतिनिधी । राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी समुदायाला आरक्षण नाकारण्यात आल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे ‘चक्का जाम’ करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबारच्या भाजपच्या प्रभारी खासदार रक्षा खडसे यांनी आज दिली आहे.

आज नंदुरबार येथे खासदार रक्षाताई खडसे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, की ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे, यासाठी माहिती सादर करण्यासाठी राज्य शासनाला न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली होती. तब्बल १६ महिने शासनाने न्यायालयात ओबीसींची माहिती दिली नाही. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. राज्यात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, राजकीय आरक्षण नसल्यामुळे त्यांना निवडणुका लढविता येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. यातच जिल्हा परिषद  व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. आतातरी शासनाने न्यायालयात ओबीसींचा आवश्यक तो डाटा जमा करावा व निवडणुकांना स्थगिती मिळवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याच मागणीसाठी शनिवार दिनांक २६ जून रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रक्षा खडसे यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

 

Protected Content