नवी दिल्ली- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | देशातील आजच्या अवस्थेला कॉंग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत आगामी पाचही राज्यांच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश लाभणार असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत भाजप सरकारच्या कामगिरीची वाखाणणी केली.
गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. ‘या निवडणुकीत मला सर्व राज्यांमध्ये भाजपची लाट दिसत आहे, भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल. या पाचही राज्यातील जनता आम्हाला सेवेची संधी देईल. ज्या राज्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली त्यांनी आमची परीक्षा घेतली, आमचे काम पाहिले.’
अखिलेश यादव यांच्या ‘उत्तर प्रदेशात भाजपकडे योजना नाहीत,’ या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात एक संस्कृती चालली आहे, राजकारणी आम्ही हे करू, आम्ही तेच करू. 50 वर्षांनंतरही कोणी ते काम केले तर ते म्हणतील की आम्ही हे त्यावेळी बोललो होतो, असे अनेक लोक सापडतील.
देशाची आज जी अवस्था आहे त्याला काँग्रेस कारणीभूत आहे. अटलजी आणि मी सोडलो तर आजवरचे सगळेच पंतप्रधान काँग्रेसच्या शाळेत घडलेले होते. जातीयवाद, भाषिक वाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार याच्यातच देश इतकी वर्षे गुरफटला असून याला केवळ आणि केवळ काँग्रेस जबाबदार आहे. यातून आपण बाहेर पडलो नाही तर देशाचं किती नुकसान होणार आहे, याचा विचार सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही मोदींनी निशाणा साधला. जी व्यक्ती ऐकूनच घेत नाही, संसदेत फिरकत नाही, त्याला मी उत्तर कसे देऊ?, असा सवाल मोदींनी केला.
‘घराणेशाहीवर चालणारे पक्ष लोकशाहीसाठी सर्वात घातक आहेत. देश संपला तरी चालेल, पक्ष लयास गेला तरी चालेल पण आपली घराणेशाही कायम राहिली पाहिजे, अशी मानसिकता असेल तर तिथे गुणवत्तेला मोल उरत नाही. म्हणून ही घराणेशाही झुगारली पाहिजे. सार्वजनिक जीवनात गुणवत्तेला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. प्रतिभावान व्यक्ती पुढे आल्या पाहिजेत’, असे मत मोदींनी मांडले. आपला देश विविधतेने नटलेला आहे. मात्र, काही नेत्यांनी त्यात आपला राजकीय हेतु साध्य करून घेतला. विविध घटकांना एकमेकांविरुद्ध भडकावण्याचे काम केले. ५० वर्षे यांनीही तोडा, फोडा आणि राज्य करा असे स्वार्थी राजकारण केले, असा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला.
पंडित नेहरू यांच्याबाबत संसदेत केलेल्या विधानावर मोदींनी अधिक स्पष्टीकरण दिले. ‘मी कुणाचे वडील, आई, नाना वा दादा याबाबत काही बोललो नाही. देशाच्या एका पंतप्रधानांनी काय केले होते हे सांगितले. तेव्हाच्या पंतप्रधानांनी एखादा विचार मांडला तेव्हा काय स्थिती होती आणि आज मी बोलत असताना काय स्थिती आहे, इतकंच सांगण्यासाठी मी तो उल्लेख केला होता, असे पंतप्रधान म्हणाले.