जळगाव (प्रतिनिधी) युतीचा निर्णय झाल्यानंतर उमेदवार कोण हा विषय फारसा महत्वपूर्ण रहात नाही, त्यामुळे जळगाव मतदार संघात भाजपाने कुणालाही उमेदवारी दिली तरी युतीधर्म पळून आम्ही त्याचा प्रचार करणार आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने केलेल्या ‘फेसबुक लाईव्ह’ मुलाखतीत केले.
श्री. वाघ यावेळी म्हणाले की, यंदाची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढावी, अशी शिवसेनेची भूमिका होती. पण आता अखेरच्या क्षणी युती झाल्याने आम्ही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. स्थानिक पातळीवर प्रत्येक उमेदवाराबद्दल कमी-अधिक प्रमाणात नाराजी नेहमीच असते. अगदी ज्या पक्षाचा उमेदवार असतो, त्यातही ही नाराजी असतेच. त्यामुळे भाजपा उमेदवाराबद्दल शिवसेनेत नाराजी असणे स्वाभाविक आहे, पण आता युती झाल्यानंतर आम्ही ती नाराजी दूर करु. जिल्ह्यात भाजपा-सेनेच्या काही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत, पण युतीमध्ये व्यक्तीला नव्हे तर पक्षाला महत्व असते.
जिल्ह्यात नेत्यांच्या नाराजीतून भाजपा-सेनेत एकमेकांच्या उमेदवारांची पाडापाडी होऊ शकत नाही, उलट जळगाव मतदार संघात गेल्या निवडणुकीत भाजपा उमेद्वाराला शिवसेनेकडे असलेल्या विधानसभा मतदार संघातून अधिक लीड मिळाले होते. जळगाव लोकसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकत नेहमीच अधिक राहिले आहे. त्यामुळे हा मतदार संघ सेनेकडे नसल्याचे शल्य आमच्या मनात कायम आहे. त्यासाठीच आम्ही पक्षप्रमुखांकडे शिष्ट मंडळाद्वारे भेट घेऊन तशी लेखी मागणी केली होती. मात्र आता राज्याचा विचार करून युतीचा निर्णय झाल्याने तो मान्य आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मिडीयाचा यंदा आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकात मोठा प्रभाव राहणार आहे. एखादी घटना, एखादी प्रतिक्रिया १०-१५ मिनिटात सगळीकडे व्हायरल होत असते. त्यामुळे सोशल मीडिया नक्कीच प्रभावी माध्यम आहे, हे गुलाबरावांनी यावेळी मान्य केले.
पहा । शिवसेना जिल्हाध्यक्ष यांची निवडणुकीतील भूमीका आणि मत