नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारावर भाजपने तब्बल १२०० कोटी रुपयांचा चुरडा केला असल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या खर्चाच्या माहितीतून ही बाब लक्षात आली आहे.
मागील वर्षी एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुकांसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्या दरम्यान भाजपने हा खर्च केला आहे. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा २०१९ च्या निवडणुकीवर भाजप तब्बल ७७ टक्के अधिक खर्च केला आहे. त्या निवडणुकांवर भाजपने ७१४ कोटी रुपये खर्च केले होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चानुसार भाजपने प्रचारासाठी १०७८ कोटी रुपये खर्च केले. तर, १८६.५ कोटी रुपये पक्षाच्या उमेदवारांवर खर्च करण्यात आले. यामध्ये माध्यामातील प्रचारासाठी ६.३३ लाख रुपये देण्यात आले असल्याचे म्हटले. प्रचार साहित्यावर ४६ लाख रुपये, प्रचार सभा, मिरवणुकांवर ९.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर, २.५२ कोटी रुपये अन्य खर्च करण्यात आले.
काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ८२० कोटी रुपये खर्च केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर ५१६ कोटी रुपये खर्च केले होते. लोकसभा निवडणुकांसह आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांसाठी भाजपच्या केंद्रीय कमिटीने ७५५ कोटी रुपये खर्च केले. यामध्ये स्टार प्रचारकांसाठी १७५.६८ कोटी खर्च करण्यात आले. माध्यमातील जाहिरातींसाठी ३२५ कोटी खर्च करण्यात आले. यामध्ये मुद्रीत, दृकश्राव्य माध्यम, बल्क मेसेज, वेबसाईट्स, टीव्ही वाहिन्या आदींचा समावेश आहे. तर, पोस्टर्स, कटआउट्स आणि बॅनरसाठी २५. ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले. जाहीर सभांसाठी १५.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर, २१२. ७२ कोटी रुपये ‘अन्य’ बाबींवर खर्च करण्यात आले आहेत. भाजपच्या केंद्रीय समितीने राज्य समितींना ६५१ कोटी रुपये निवडणुकांसाठी दिले होते.