भाजप-शिवसेनेत लवकरच पॅच-अप होणार !

fadanvis thakare

मुंबई, वृत्तसंस्था | गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेदरम्यानचे ताणले गेलेले संबंध काहीसे सैल झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदाबरोबरच १३ मंत्रिपदे देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीद्वारे स्पष्ट झाले आहे.

 

भारतीय जनता पक्ष लवकरच सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. हा गुंता सोडवण्यासाठी फडणवीस स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करणार असल्याची माहिती भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याने दिली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही दोन पक्षांमधील संबंध जुळण्याकडे वाटचाल होत असल्याचे संकेत दिले आहेत.

आपल्या नेतृत्त्वात नवे सरकार येत्या दोन दिवसांमध्ये स्थापन होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजप-शिवसेना युतीकडे स्पष्ट बहुमत असून काही अपक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे. युतीने २८८ पैकी १६१ जागा जिंकल्या आहेत. या जनादेशाचा मान राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे फडणवीस म्हणाले. स्थिर सरकार स्थापन करण्यामध्ये काही अडथळे आहेत, असे आम्हाला वाटत नाही. कळीच्या मुद्यांवर लवकरच एकमत होईल, असा आपल्याला विश्वास असून लवकरच सरकार स्थापन केले जाईल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिवसेना करणार तडजोड ?
शिवसेना आज (गुरूवार) आपल्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जास्तीत जास्त आणि महत्त्वाची मंत्रिपदे पदरात पाडून तडजोड करू शकते, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

शिवसेनेला १३ ते १८ मंत्रिपदे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष स्वत:कडे २६ मंत्रिपदे ठेवून १३ शिवेसनेला देईल. भाजप राजस्व, अर्थ, गृह आणि नगरविकाससारखी महत्त्वाची मंत्रिपदे स्वत:कडे ठेवणार आहे. शिवसेनेला देण्यात येणाऱ्या १३ मंत्रिपदांमध्ये कोणती खाती असतील, याबाबत मात्र चर्चेनंतरच निश्चिती होईल. १३ वरून ही संख्या १८ वरदेखील पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Protected Content