भाजपाने नाक घासून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी : धनंजय मुंडे

dhananjay munde

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाच्या कार्यकर्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत असून ते सर्वांच्या रक्तात आहेत. आमच्या महाराजांची तुलना मोदींसोबत करुन भाजपाने त्यांना सुरुवातीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांप्रती किती घृणा आहे हे दाखवले आहे. त्यामुळे भाजपने रायगडावर जाऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी कडवट शब्दात महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. फक्त विरोधकच नाही तर सर्वसामान्यांकडूनही याप्रकरणी रोष व्यक्त केला जात आहे. यावर धनंजय मुंडे यांनी ट्विट करतही आपला संताप व्यक्त केला आहे. मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने कधीही महाराजांचा अपमान सहन केलेला नाही. पण आता सहनशक्तीच्या पलीकडे चालले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यास जनता तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही असेही मुंडे म्हणाले आहेत.

Protected Content