मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंडखोरोना भाजपने फुस लावली असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा डाव आखण्यात आल्याची टीका आज शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आज बंडखोरांसह भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, बंडखोर आमदारांना जे करायचे त्यासाठी ते मुखत्यार आहेत त्यात सात-आठ मंत्री आहेत, आमदार आहेत. आपली मंत्रालये, विभाग सोडून ते महाराष्ट्राबाहेर जाऊन बसले आहेत. कृषी, उच्च शिक्षण, पाणीपुरवठा, फलोत्पादन वगैरे खाती जनतेच्या जिव्हाळ्याची आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वार्यावर सोडून गुवाहाटीच्या ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलात बसले आहेत. जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन ते राज्याबाहेर गेले असते, पण शिवसेनेने दिलेली मंत्रीपदे कायम ठेवून ते तत्त्वाची भाषा करीत आहेत, अशी टीका यात करण्यात आलेली आहे.
यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपामधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव असल्याचे भाजपाच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केले. यावर प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी म्हणवून घेणार्यांचे काय सांगणे आहे? जो भाजपा सतत महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करीत आहेत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.