अहमदाबाद वृत्तसंस्था । गुजरातमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेली अधिसूचना मागे घ्यावी अशी मागणी मनसुख वासवा यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली होती. यानंतर त्यांनी आता थेट पक्षाचा राजीनामा दिला असून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.
मनसुख वसावा हे भडोच मतदारसंघातून तब्बल सहा वेळेस लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी. आऱ. पाटील यांनाही पत्र पाठवले आहे. आपल्या चुकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी आपण राजीनामा देत आहोत. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत. कृपया आपल्याला माफ करावे, असे वसावा यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.