कल्याण-वृत्तसेवा | भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या दोन नेत्यांवर थेट पोलीस स्थानकातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी काल रात्री उशीरा हिललाईन पोलीस स्थानकात गोळीबार केल्याने शिवसेनेचे दोन नेते जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड यांच्यात राजकीय वैमनस्य सुरू आहे. काल या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. यानंतर हे सर्व जण कल्याणमधील हिललाईन पोलीस स्थानकात गेले.
या पोलीस स्थानकात आमदार गणपत गायकवाड यांची महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांसोबत बाचाबाची झाली. याप्रसंगी संतप्त झालेल्या आमदारांनी थेट सहा फैरी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक राहूल पाटील यांना गोळ्या लागल्याने ते जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात भाजप आणि शिंदे गटात अनेकदा सुप्त व उघड स्पर्धा दिसून आली आहे. यातच कल्याण पूर्वमधून महेश गायकवाड हे विधानसभेसाठी तयारी करत असून भावी आमदार म्हणून त्यांचे अनेक फलक देखील लागले आहेत. या पार्श्वभूमिवर, दोन्ही गटांमधील चकमक थेट गोळीबारापर्यंत पोहचल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर थेट सत्ताधारी आमदारानेच पोलीस स्थानकात गोळीबार केल्याने आता विरोधक त्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.