भाजप सरकारकडून मुस्लिमांना भेदभावाची वागणूक – खा. अजमल

mp.badruddin ajmal

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांना माणसांसारखी वागणूक दिली जात नाही. त्यांना किड्यामुंग्यांसारखी वागणूक दिली जात आहे, असा गंभीर आरोप ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक फंडचे (एआययूडीएफ) प्रमुख आणि लोकसभा खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे. मुस्लिमांसोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांना भारतीय नागरिक समजले जात नाही, असेही ते म्हणाले.

 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही त्यांनी मत व्यक्त केले. उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागांतही पाहा. अलीकडच्याच घटना पाहाल तर पोलिसांना आंदोलकांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र, त्यानंतर त्यांना कशाबद्दलही विचारले जात नाही. याउलट त्यांचे कौतुक केलं जात आहे, असे अजमल एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. भाजप नेत्यांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते खूपच निंदनीय आहेत. मात्र, ही परिस्थिती खूप काळ राहणार नाही. भाजपने देशाचा कारभार हाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तरी देशातील सत्ता त्यांच्या हाती आहे, मात्र, उद्या देशाची सत्ता अन्य कुणाच्या हातात असेल, असेही ते म्हणाले.

‘हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न’
भाजपनं सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, त्यांचे हे धोरण खूप जास्त काळ चालेल, असे मला तरी वाटत नाही, असेही अजमल म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज ऐकू इच्छित नाही. त्यांना वाटतेय की, त्यांच्याकडे बहुमत आहे आणि ते काहीही करू शकतात, पण हा भ्रम आहे, असेही ते म्हणाले. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने आणि देशात लागू केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून ते लोकांना बाहेरचे असल्याचे सिद्ध करू शकतात, असे मोदी सरकारला का वाटत आहे ? हे जास्त काळ चालू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘मोदी स्वतःच्या जाळ्यात अडकतील’
ज्या पद्धतीने मोदी काम करत आहेत, ते बघता मोदी स्वतःच जाळ्यात अडकतील. संपूर्ण जगभरात त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी आपल्या धोरणांवर पुनर्विचार करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. आज संपूर्ण देश जळत आहे. पोलिसांकरवी जनतेचा आवाज दाबला जात आहे. पुढील काळात अशीच परिस्थिती राहिली तर, सत्ता हमेशा गुलाम राहत नाही, याचा विचार त्यांनी करायला हवा, असा इशाराही त्यांनी दिला.

Protected Content