दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यसभेत मिशन फत्ते केल्यानंतर भाजपने आता जुलै महिन्यात संपन्न होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
भाजपने आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्र पक्षांसोबत चर्चा करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. यासह यूपीएच्या मित्रापक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर या चर्चेची जबाबदारी भाजपने सोपवली आहे.
एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. दि. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून दि.२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. छोट्या मोठ्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी चुरस सुरु झाली आहे.
“भारतात लोकशाही पूर्णपणे संपत असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र आल्यास यातूनच पुन्हा एकदा लोकशाही वाचवता येईल.” असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी दि. १५ जून रोजी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. यात देशातील २२ विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र येण्यासाठी पत्र लिहिले आहे.