मुंबई प्रतिनिधी । विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे पण स्वत:च निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडा-ओरडा करू नये असा सल्ला देत शिवसेनेने आज शूSSS शांतता राखा आक्रमणाला वेळ आहे असे सांगून भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची खिल्ली उडविली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामना मध्ये आज अग्रलेखातून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी असा आक्रमक पवित्रा घेणे चुकीचे नाही. राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला आहे.नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.
यात पुढे नमूद केले आहे की, गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक या राज्यांत कोरोना महामारीने जे अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले आहे, त्याची संपूर्ण माहिती आम्ही महाराष्ट्र किंवा दिल्लीच्या भाजप कार्यालयात पाठवायला तयार आहोत. ही बहुतेक भाजपशासित राज्ये स्वबळावरच (तोडफोड करून) सत्ता भोगत आहेत व यापैकी अनेक राज्ये कोरोना संकट देवावर सोडून मोकळी झाली आहेत. गुजरातची स्थिती तर चिंताजनक आहे, पण त्याचे राजकारण होऊ नये. महाराष्ट्रासारख्या राज्यात मनासारखे राजकारण घडले नाही म्हणून राज्याच्या अस्तित्वावरच शिंतोडे उडवायचे हा उद्योग बरा नव्हे! राज्यात सध्या जी व्यवस्था सुरू आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये. भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे पण आपण निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडा-ओरडा करू नये. श्री नड्डा हे संवेदनशील नेते असून त्यांना असा गोंगाट सहन होत नाही. शूSSS शांतता राखा आक्रमणाला वेळ आहे असे या अग्रलेखात म्हटले आहे.