जळगाव, प्रतिनिधी | तोडफोडीचा आरोप माझ्या ऐवजी राष्ट्रवादीवर केला असता तर अधिक आनंद झाला असता असे म्हणत ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपाने केलेले आरोप फेटाळून लावले. काल पाळधी येथे भाजपा मेळाव्याची तयारी सुरु असतांना काही अज्ञात व्यक्तींनी तेथे तोडफोड केली होती. ही तोडफोड ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, त्यास ते उत्तर देत होते.
मी एक जबाबदार मंत्री असून प्रत्येक माणसाला लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाचा विचार मांडण्याचा अधिकार आहे हे मला कळते, असे ना. पाटील यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री ‘महा जनादेश’ यात्रा घेऊन आले होते. तेव्हा माझ्या मुलाने त्यांचे स्वागत केले होते. आम्ही एवढ्या मोठ्या मनाची माणसे आहोत. खा. उन्मेश पाटील यांचा प्रचार तीन महिन्यापूर्वी भाजपापेक्षा जास्त केला असल्याचा दावाही त्यांनी केला. तालुक्यातील भाजपातील काही असंतुष्ट लोक आहेत. हे दोन-तीन लोक जुन्या वादातून माझा विरोध करत असतात. त्यांना कुठलेच कारण नसल्याने स्वतःच माणसे पाठवून लाईट फोडायचे व गुलाबराव पाटलानी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, असे आरोप करायचे हे त्यांचे धोरण आहे. असले घाणेरडे कृत्य मी किवा माझ्या कार्यकर्त्याकडून कधीच होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपा मित्रपक्ष आहे, म्हणजेच शिवसेना व भाजपा यांची राज्यात युती आहे. अजून युती तुटलेली नाही. या मेळाव्यातून माझाही फायदा होऊ शकतो, हा आरोप त्यांनी माझ्या ऐवजी राष्ट्रवादीवर केला असता तर मला अधिक आनंद झाला असता, असेही त्यांनी पुढे सांगितले.