मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २७ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १० मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपकडून विधान परिषदेच्या तीन जागांसाठी नावे निश्चित करण्यात आली असून ती दिल्लीला पाठविण्यात आली आहेत. महाराष्ट्र भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तिघांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली आहेत. भाजपने या उमेदवारांची घोषणा लवकरच करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम उमेदवार कोण असेल, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित केला जाणार आहे. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, पक्षाकडे केवळ एकच जागा असल्याने अंतिम निर्णय कोणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना शिंदे गटाने देखील आपल्या उमेदवारासाठी अंतर्गत चर्चा सुरू केली असून अंतिम उमेदवाराची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक नेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १७ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १८ मार्च रोजी अर्ज छाननी होणार असून २० मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते सायं ४ या वेळेत मतदान होईल, त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल व निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीत भाजपकडे ३, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे प्रत्येकी १ जागा असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवार निश्चितीच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.