सोलापूर (वृत्तसंस्था) मला व माझी मुलगी आमदार प्रणिती शिंदे हिला भाजपने ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस भवनमध्ये बोलताना केला.
काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस भवनमध्ये आयोजित सभेत बोलताना भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. भाजपवाल्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती. इतकेच काय आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही आग्रह करण्यात आला होता,असे ते यावेळी म्हणाले.
आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत. त्यामुळे आम्ही दोघांनीही भाजपच्या ऑफरला स्पष्टपणे नकार दिला. भाजप जातीधर्माचे राजकारण करतेय, हुकूमशाही राजवट आणण्याचा त्यांचा प्रयत्न होतोय. लोकशाहीला हे घातक असून, या निवडणुकीत लोक भाजपला थारा देणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही शिंदे यांनी टीका केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे रात्रंदिवस एक करून संविधान लिहिले. भारतीय संविधानाचा ढाचा सर्वधर्मसमभाव असा आहे. पण आता डॉ. आंबेडकर यांच्या नातूकडून संविधानाला गाडण्याचे काम होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे यांनीही भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
याप्रसंगी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, माजी खासदार धर्मण्णा सादूल, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, स्मृती शिंदे, धर्मराज काडादी, राजशेखर शिवदारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, गटनेते चेतन नरोटे, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, प्रवक्ते मनोहर सपाटे, झेडपीतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करंगुळे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ आदी उपस्थित होते.