पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त १५ दिवस कार्यक्रम

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षातर्फे तब्बल १५ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून ते वयाची ७२ वर्षे पूर्ण करत आहेत. याचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षातर्फे विविधतेत एकता या नावाने पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत रक्तदान शिबीरं, जल संवर्धनासंदर्भात जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण, दिव्यांग व्यक्तींना उपकरणांचं वाटप, स्थानिक उत्पादनांचा प्रचार आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे.

१७ सप्टेंबर पासून या कार्यक्रमांचे आयोजन सुरू होणार असून महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी याची सांगता करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमासंदर्भात अरुण सिंह यांनी राज्यांना एका पत्राद्वारे सुचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नमो’ या ऍपवर या उपक्रमांचा तपशील भरण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना पक्षाकडून देण्यात आले आहेत. यातील पाच उत्कृष्ट युनिट्सला पुरस्कार दिला जाणार आहे.

Protected Content