जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या तरूणाच्या विद्यूत तारेचा आकोडा गळ्यात अडकल्याने गळ्याला फास बसल्याची धक्कादायक घटना घडली. यात जखमील दुचाकीस्वाराला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र विजय सोनार (३८, रा. हरिओम नगर, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो शहरातील एका व्यसनमुक्ती केंद्रात कामाला आहे. रविवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून कानळदा रस्त्याने घरी जात असतांना त्यावेळी समोरून एक ट्रक जळगावकडे येत होता. त्या रस्त्यावरून गेलेल्या केबल, आकोडे टाकण्यात आले होत. हे आकाडे व केबल वायर ट्रकमध्ये अकडून ते ट्रकसोबत ओढत आले व बाजूने जात असलेल्या जितेंद्र सोनार यांच्या गळ्यात अकडले. त्यावेळी या केबलचा दुचाकीस्वाराच्या गळ्याला अक्षरश: फास बसला व ट्रकमुळे केबल पुढे ओढत गेल्याने त्यांचा गळा चिरला गेला. जबर जखमी होऊन ते खाली कोसळले. त्यावेळी योगेश साळी, चेतन बडगुजर यांच्यासह काही तरुणांनी धाव घेत दुचाकीस्वाराला जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून घरी आणले, मात्र जखम अधिक तीव्र असल्याने तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून हा प्रकार तरुणाच्या जिवावर बेतला नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, शहर व परिसरात पसरलेल्या या केबळ व अनाधिकृत आकोड्यांचे जाळे हटविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.