जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कृष्णा लॉन्सजवळ दुचाकीने जात असलेल्या तरुणाचा भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस टँकरने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता घडली आहे या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास प्रकाश कोळी (वय-२२, रा.खर्डी ता. चोपडा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास कोळी हे आपल्या परिवारासह चोपडा तालुक्यातील खर्डी येथे वास्तव्याला आहे. ते कीर्तनकार असून कीर्तन करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवार २३ डिसेंबर रोजी त्यांचे पाचोरा येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यानंतर ते दुचाकीने जळगाव येथे येत असताना जळगाव शहरा नजीकच्या कृष्णा लॉन समोर रात्री १२.३० वाजता गॅसच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत कीर्तनकार कैलास कोळी यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले रविवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहीण आणि असा परिवार आहे.