नवी दिल्ली । बिहार राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा करण्यात आली असून येथे तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या माध्यमातून रणधुमाळीस प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यात निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. यानुसार, बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. यातील पहिल्या टप्प्याची अधिसूचना १ ऑक्टोबरला जारी होणार आहे. तर पहिल्या टप्यात २८ ऑक्टोबरला मतदान होईल. दुसर्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला मतदान होईल. तर तिसर्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे.तर तिन्ही टप्प्यातील निवडणुकीचे निकाल अर्थात मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक ही कोरोनाच्या संक्रमणानंतर देशातील पहिलीच निवडणूक असल्यानं केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात आधीच नियमावली जाहीर केलेली आहे. याच्या अंतर्गत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान कर्मचार्यांचीही संख्या वाढवण्यात आलेली आहे. मतदान केद्रांवरील मतदारांची संख्या कमी करून मर्यादित करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया होत असताना करोनाचा प्रसार न होण्यासाठीही काळजी घेण्यात आलेली आहे. मतदारांना मास्क, सॅनिटायझर लावून येण्याच्या सूचना दिलेल्या आहे. तर मतदान केंद्रांवरही मास्क, सॅनिटायझेशन आणि शरीराचं तापमान मोजण्यासाठीचे उपाय करण्यात येणार आहेत.
तसेच कोरोनामुळे बिहारमध्ये मतदानाची वेळ एका तासाने वाढविण्यात आली आहे. येथे सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर, या निवडणुकीत व्हर्च्युअल प्रचारावर भर देण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे. उमेदवार हा घरोघरी जाऊन प्रचार करणार असेल तर त्याच्या सोबत पाच जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.