यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील गाड्र्या जामन्या या अतीदुर्गम आदीवासी भागातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अनोळखी ३० ते ४० वर्षीय महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याने घातपात झाल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
विश्वसनीय पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील गाड्र्या जामन्या या अतिदुर्गम भागात निळकंठ कुटियाजवळ कोरडा तलाव आहे. वनविभागाचे कर्मचारी हे या परिसरातून जात असतांना त्यांना तलावात अनोळखी अंदाजे ३० ते ४० वर्षीय महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सोमवारी १४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघडकीला आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पो.नि.प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.