Home Uncategorized मोठी बातमी : चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोरी; लाखोंचा...

मोठी बातमी : चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक गावात मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन घरांमध्ये घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बांभोरी गावात एकच खळबळ उडाली असून, या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी बुद्रुक गावात चोरट्यांनी १९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास तीन ठिकाणी हात साफ केले. यात बुधा श्रावण पाटील या वृद्ध व्यक्तीच्या घरातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यानंतर चोरट्यांनी गणेश दयाराम पाटील यांचे घर फोडले. त्यांच्या घरातून सात ते आठ तोळे सोने आणि ३ लाख रुपये रोकड असा मोठा ऐवज लंपास केला. याचबरोबर, गावातच राहणाऱ्या प्रमोद शालिक पाटील यांच्या घरातून सोने-चांदीच्या वस्तू आणि १२ ते १३ हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याचे समोर आले आहे. एकाच रात्री तीन घरांना लक्ष्य केल्याने चोरट्यांनी गाव अक्षरशः पिंजून काढल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी तात्काळ बांभोरी गावात धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही चोरी झालेल्या घरांची कसून तपासणी केली. यावेळी चोरट्यांनी घरात घुसून कपाटांमधील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. विशेष म्हणजे, देव्हाऱ्यातील चांदीची नाणी आणि मूर्ती देखील चोरून नेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ श्वान पथक आणि ठसे घेणाऱ्या पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले. या पथकांनी पुढील चौकशीला सुरुवात केली असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धरणगाव पोलीस ठाण्यात या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी विनायक होते, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, बीट कॉन्स्टेबल दीपक पाटील आणि योगेश पाटील हे उपस्थित होते. एकाच रात्री झालेल्या या तीन घरफोड्यांमुळे बांभोरी बुद्रुक गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तात्काळ चोरट्यांना पकडून गावात सुरक्षितता निर्माण करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Protected Content

Play sound