मोठी बातमी : तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने तरूण गंभीर जखमी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ आर्थीक व्यवहारावरून झालेल्या वादातून भादली येथील तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे या घटनेनंतर संशयित आरोपी स्वतःहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव मोहित सुनील चौधरी (वय २४, रा. भादली, ता. जळगाव) असे आहे. तो आपल्या कुटुंबासह भादली येथे राहतो. या घटनेतील संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर, जळगाव) याच्याशी मोहितची ओळख होती. दोघांमध्ये पूर्वी आर्थिक देवाण-घेवाण झाली होती. या आर्थिक व्यवहारावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

बुधवारी दुपारी मोहित चौधरी हनुमान मंदिराजवळ आला असता, त्याची आणि धीरज पाटील याची बाचाबाची झाली. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि अचानक धीरज पाटील याने मोहितच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहितला पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदत केली आणि त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content