मोठी बातमी : मंदाताई खडसे यांची याचिका फेटाळली : आ. मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । जिल्हा दूध संघातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता असतानाच मंदाताई खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा दूध संघाची निवडणूक मोठ्या चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सर्वपक्षीय पॅनलची आशा आता दुर झाल्याचे दिसून येत आहे. यातच मुक्ताईनगर मतदार संघातून मावळत्या अध्यक्ष मंदाताई खडसे यांच्यासमोर आमदार मंगेश चव्हाण यांनी अर्ज भरल्याने येथील निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मंगेश चव्हाण यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवता येणार नाही, असा युक्तिवाद करत मंदाताई खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर बुधवार १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. यावर न्यायालयाने मंदाताई खडसे यांचा दावा खोडून काढला. यामुळे आता मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुक्ताईनगर मतदार संघातून यामुळे मंदाताई खडसे यांच्यासमोर आमदार मंगेश चव्हाण यांचे अतिशय प्रबळ आव्हान राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. किंबहुना यंदाच्या निवडणुकीतील सर्वात वलयांकित मतदार संघ म्हणून मुक्ताईनगर ठरणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content