जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्याभरात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत एकूण ५ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये ४ ट्रॅक्टर आणि १ ट्रकचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. चोपडा, चाळीसगाव, जळगाव आणि पाचोरा उपविभागातील पथकांनी ही कारवाई केली आहे.

* चोपडा: १६ जुलै रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर पकडण्यात आला. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* चाळीसगाव: २४ जुलै रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आणि दंडात्मक कारवाईसाठी मेहुणबारे पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला.
* जळगाव (रामानंद नगर): ७ ऑगस्ट रोजी गणपतीनगर परिसरात विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडून तहसीलदारांना दंडात्मक कारवाईसाठी अहवाल पाठवण्यात आला. हा ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.
* जळगाव (जिल्हापेठ): ८ ऑगस्ट रोजी मानराज पार्क राष्ट्रीय महामार्गावर ‘एमएच १९. २१९१’ क्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला. यावरही दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांना अहवाल सादर करण्यात आला असून, हा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आला आहे.
* पाचोरा: ७ ऑगस्ट रोजी भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू असून, आगामी काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे.



