भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा रस्ता अडावत महिलेजवळील दागिने रूमालात ठेवण्याचे सांगून हातचालाखीने २ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना गुरुवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळील बसस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वसंत जगन्नाथ पाटील (वय-१९, रा.आदर्श गल्ली भुसावळ) हे आपला परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता वसंत पाटील हे महिलेसह दुचाकीने दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राजवळील बसस्थानकाजवळून जात होते. त्यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता आडविला आणि म्हणाले की आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला सिटी मारली, तुम्ही थांबले का नाहीत? आताच या रस्त्याने म्हातारीला लुटलेले आहे, तुम्ही काय एवढे सोने घालून फिरत आहेत. ते काढा, असे सांगून वसंत पाटील व महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी सोने व कागदपत्रे रूमालात बांधण्याचे सांगितले. दोघांवर विश्वास ठेवून महिलेने अंगावरील सोने काढून रूमालात ठेवले. तुमचे सोने डिक्कीत ठेवून देतो असे सांगत हातचालाखी करून तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्याची धक्कादायक घटना घडली. सोने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वसंत पाटील यांनी तातडीने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काडेकर आहे.