जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय बालिकेला कुलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली याबाबत जळगाव तालुका पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. अक्षदा किशोर मोरे (वय-१२) असे मयत बालिकेचे नाव आहे.
या संदर्भात नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की जळगाव तालुक्यातील विनोद गावात बारा वर्षीय अक्षदा हे आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहत होती. तिचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई ही हात मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होती. दरम्यान शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळेला विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. तिथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.