जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे २६ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भुसावळ येथील तीन जणांच्या टोळीला हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवार, ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता दिले.
यात टोळी प्रमुख मुकेश प्रकाश भालेराव (वय-२७, रा. राहुलनगर, भुसावळ), टोळी सदस्य शामल शशिकांत सपकाळे (वय- २७, रा. न्यू. सातारा, भुसावळ), भरत मधुकर महाजन (वय-२७, रा. शिवपूर, भुसावळ) यांच्यावर कारवाई केली आहे.
भुसावळ शहरातील टोळीने गुन्हे करणाऱ्या या तिघांवर भुसावळ शहर व तालुका, शनिपेठ पोलिस ठाणे, यावल, फैजपूर अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये २६ गंभीर गुन्हे आहेत. या टोळीमुळे नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी पाठवला होता.
या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंजुरी देत मुकेश भालेराव, भरत महाजन व शामल सपकाळे या तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे