
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत असून, सर्वाधिक फटका बसलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादींना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले नाही. या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे.

राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपाने वर्चस्व प्रस्थापित करत बहुसंख्य ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवून दिली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता आली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या राष्ट्रवादीची पारंपरिक बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या महापालिकांतही भाजपाने मुसंडी मारत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे आणि काही ठिकाणी समन्वय साधत जोरदार प्रयत्न केले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले होते. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या ‘घड्याळ’ चिन्हावर प्रचार करताना दिसून आल्या होत्या. मात्र, एवढ्या प्रयत्नांनंतरही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीला तब्बल ३९ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी अजित पवार गटाला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले, तर शरद पवार गटाला अवघ्या ३ जागा मिळाल्या. ही घसरण राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब ठरली आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यातील तब्बल १८ महापालिकांमध्ये खातेही उघडता आलेले नाही.
या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आत्मपरीक्षण सुरू झाले असून, पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यासच पक्षाचे अस्तित्व आणि प्रभाव टिकू शकतो, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू असल्याचे समजते.



