मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आजपासून विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्याआधीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेला दावा राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा ठरला आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतरांच्या कालावधीत भाजप नेते मोहित कंबोज यांनी आधीच अनेक घटकांचे सूचक भाकीत केले होते हे नंतर सिध्द झाले. यानंतर आता त्यांनी विविध ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एक बडा नेता कारागृहात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. यातच त्यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख देखील केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
यातील पहिल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केला आहे. यानंतर दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, २०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.
यासोबत तिसर्या ट्विटमध्ये त्यांनी आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. संबंधित नेत्याची भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, प्रेयसींच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार असल्याचा दावा केला आहे.