मुंबई–लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर आघाडीतील पक्षांमध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका संजना घाडी यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
संजना घाडी या ठाकरे गटाच्या उपनेत्या होत्या आणि त्यांचा पक्षातील सक्रिय सहभाग उल्लेखनीय होता. काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीत सुरुवातीला त्यांचं नाव नव्हतं, नंतर शेवटच्या क्षणी त्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
आता संजना घाडी यांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती संजय घाडी यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना ठाकरे गटातील नेत्यांच्या होणाऱ्या गळतीमुळे पक्षासाठी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. संजना घाडी यांचा शिंदे गटात होणारा प्रवेश ही एक मोठी नामवंत राजकीय घडामोड असून मुंबईतील आगामी राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.