भुसावळ प्रतिनिधी | शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रायफल, बंदूका, तलवारी आणि चाकूंसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना साठा जप्त करून गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, शहरातील संशयास्पद पार्श्वभूमि असणार्या लोकांच्या घराची झडती घेण्याची परवानी वरिष्ठ पातळीवरून मागण्यात आली होती. याबाबत परवानगी मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्थानकाची दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणार्या घरांमध्ये छापेमारी केली.
या कारवाईत मुस्लीम कॉलनी भागातील ईदगाह समोर राहणारा शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख यांच्याकडे मोठा शास्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. याची खातरजमा करून पथकाने छापा मारला असता शेख याच्या घराजवळच्या शेडमध्ये मोठा साठा मिळाला. यात चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदूक आदींचा समावेश आहे. पोलीस पथकाने हा साठा जप्त करून बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे.
ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे, पोहेकॉ जयराम मोरे, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्हाडे, कृष्णा देशमुख, समाधान पाटील, प्रशांत सोनार, मीना कोळी, जयेंद्र पगारे यांच्या पथकाने केली. दरम्यान, या प्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुरनं ३४२/२०२१ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरिक्षक दिलीप भावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयेंद्र पगारे हे करीत आहेत.