भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकार्यांनी काढले आहेत. तर, पोलीस प्रशासनाने इतर गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली असून काही जणांची हद्दपारी होण्याची शक्यता आहे.
शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि गुंडांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यातच आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पोलिस प्रशासनाने उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांतांकडे सादर केले आहेत.
या अनुषंगाने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी गणेश कवाडे व राहूल कोळी या दोघांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यामध्ये गणेश रमेश कवडे (रा.गमाडिया प्रेस, जुनी जीन, भुसावळ) याला एका वर्ष, तर राहुल नामदेव कोळी (रा.जुना सातारा, मरिमाता मंदिराजवळ, भुसावळ) याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. कवडे विरूद्ध हाणामारी, प्राणघातक हल्ला, शासकीय कामकाजात अडथळा असे ७ गुन्हे, तर राहुल कोळी विरूद्ध जबरी लूट व हाणामारीचे चार गुन्हे आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून लवकरच इतर गुंडांवर देखील कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.