भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरापासून जवळच असलेल्या खडका येथे एका महिलेस जबर मारहाण करत विवस्त्र करून हल्लेखोरांनी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, खडका येथील सूतगिरणीच्या परिसरात असलेल्या एका खोलीत काल सकाळी एक महिला बेशुध्दावस्थेत आढळून आली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी त्यांना त्या महिलेस बेदम मारहाण केल्याचे दिसून आले. तसेच या खोलीच्या भिंतीवर देखील रक्ताचे डाग उमटल्याचे पोलिसांना दिसले.
दरम्यान, पोलिसांनी या महिलेस तात्काळ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. ती वारंवार बेशुध्द पडत असल्याने तिच्याकडून पूर्ण माहिती मिळाली नाही. मात्र पोलिसांनी तिच्या बहिणीला शोधून काढले असून या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या महिलेचे वय पन्नाशीच्या पुढचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तिला नेमकी कुणी आणि कशासाठी मारहाण केली ? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.